|| बलवत्तर || Poem by Rajeev Deshpande

|| बलवत्तर ||

माझा विधिलिखित तुकडा, आहे सुरक्षित
दुर्गम डोंगर माथ्यावरील अजाण वृक्षाच्या ढोलीत.
त्या खेटून खेटून, नेटाने रेटून उभ्या
असंख्य वेलीवृक्षांच्या गळाभेटीत हा वृक्ष दडलेला!
हुलकावणा-या डोंगर वाटेवर, अवकाळी सावट दाटलेले.
मी जागीच खिळलेला, मूग गिळलेला,
वाढ खुंटलेला, खुंट वाढलेला!
डोंगर माथ्यावर आस लावून,
डोंगर पायथ्याशी ताटकळलेला.
तोच काळमेघांची भेदक डरकाळी,
चुकविते काळजाचा ठोका!
अन् संभ्रमाची बेछूट गारपीट
उडविते त्रेधातिरपीट!
...... दाणादाणीत उरते ती फक्त, मू़ठभर मातीची आण! ! !
तोच त्या भेसूर आभासात, कडाडते लकाकी क्षणैक!
अन् युगांनी दिसते ती, झळकती विजय पताका.
मी नकळत पाऊल उचलतो
डोंगर माथा गाठण्यास!
*****
~ राजीव निळकंठ देशपांडे

POET'S NOTES ABOUT THE POEM
An abstract poem about adversity.
COMMENTS OF THE POEM
READ THIS POEM IN OTHER LANGUAGES
Close
Error Success