अमर्याद Poem by Rajeev Deshpande

अमर्याद

लोकांत मिसळावे इतके
की इतरांनी बोध घ्यावा
एकांतात रुळावे इतके
की लोकांनी शोध घ्यावा

सुखात लोळावे इतके
की खरे सुख कळावे
दुःखात पोळावे इतके
की खोटे अभिमान गळावे

वैर करावे इतके
की धाबे दणाणून सोडावे
प्रेम करावे इतके
की विरोध हाणून पाडावे

उंच उडावे इतके
की यश खेचून आणावे
खोल बुडावे इतके
की मोती वेचून आणावे

फिरत रहावे इतके
की पायात काटे मोडावे
रुजत रहावे इतके
की मातीशी नाते जोडावे!

COMMENTS OF THE POEM
READ THIS POEM IN OTHER LANGUAGES
Close
Error Success