|| व-हाडची माती || Poem by Rajeev Deshpande

|| व-हाडची माती ||

औदार्याची चटक लावते
व-हाडची ही माती
सहज पडल्या भेटीगाठी
होतात जीवाची नाती

संवेदनशील मने इथली
व्यथा काव्यात गाती
जाण उपजत प्रतिभेची
थोपविते लेखणी हाती

संपन्नतेचा येता पूर
मातीला लोटांगणी जाती
संकटात होतात समशेर
उभ्या पिकाच्या पाती

इमान पिकविते जमीन
गोडवे भूमीपुत्र गाती
कमविण्या मीठ भाकर
बळ सळसळते हाती

श्रीमंत अथवा गरीब
हुकुमत गाजवते माती
सापशिडीच्या खेळात
बेसावध धोका खाती

आशीर्वादित भाग्यवंत
प्रगती पंथा जाती
उपेक्षित नको गुणवंत
शिकविते ही माती

नांदतात गुण्या गोविंदाने
धर्म पंथ जाती
प्रसवून जीवांना परत
पोटात घेते माती

करूनी जीवनाचे सोने
कुशीत मातीच्या जाती
पडता विसर मातीचा
होते जीवनाची माती

फळ देते प्रारब्ध
प्रयत्न आपल्या हाती
कठीण कसोटी अंती
न्याय देते माती

तावून सुलाखून येथे
यश लागते हाती
मातीतून घडणा-याचे
लोक गुणगान गाती

बदलला जरी काळ
जपतात रिती भाती
विखुरले चौफेर जरी
आठविते काळी माती

आब राखण्या मातीची
सुजाण खस्ता खाती
पेरूनी पुरूषार्थ आपुला
शरण मातीला जाती

पूर्वजांच्या स्मृतिगंधाने
दरवळते ही माती
पांग फेडण्या मातीचे
जळतात जीवाच्या वाती!

~ राजीव निळकंठ देशपांडे

POET'S NOTES ABOUT THE POEM
This poem is dedicated to Varhad, Vidarbha, Maharashtra
COMMENTS OF THE POEM
READ THIS POEM IN OTHER LANGUAGES
Close
Error Success